जिल्ह्यातील दोन mbbs अधिकाऱ्यांचे धडाकेबाज नियोजन

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख दोघेही MBBS, धडाकेबाज प्लॅनिंग, चंद्रपुरात एकही कोरोना


तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. (Chandrapur Collector and SP MBBS)
चंद्रपूर : कोरोना हे एक जागतिक संकट आहे. संपूर्ण जग या महामारीचा सामना (Chandrapur Collector and SP MBBS) करत आहे. महाराष्ट्रात तर हे एक युद्ध असल्याचं म्हटलं आहे. या युद्धाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहेत. मुंबई-पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. असं असताना तिकडे तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. (Chandrapur Collector and SP MBBS)

चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. हे दोघेही जिल्ह्याची प्रमुख पदं सांभाळत असले तरी त्यांचं शिक्षण त्यांना या लढाईत मोलाची साथ देत आहे. कारण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे दोघेही MBBS आहेत.

चंद्रपूर हा एक औद्योगिक जिल्हा आहे. लगतची छत्तीसगड- तेलंगणा ही राज्ये या जिल्ह्याशी जोडली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांचं केंद्र असलेल्या चंद्रपूरला कोरोनाचा धोका अधिक असणं स्वाभाविक होतं. मात्र आजपर्यंत या जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संकट नियंत्रणाची जबाबदारी असलेले दोन अधिकारी स्वतः डॉक्टर आहेत. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे डॉक्टर आहेत. या दोघांच्या नियोजनाने चंद्रपूर जिल्ह्यात आजवर एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. या रोगाची लागण होऊ शकणाऱ्या सर्व बाबींची नियोजनपूर्वक आखणी करून या अधिकाऱ्यांनी चंद्रपूरकरांना मोठा दिलासा दिला आहे.

सुमारे तीस लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नसणे मोठे आव्हान होते. मात्र जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचं कसब या संकटकाळात वापरलं.

खेमणार यांनी 2008 मध्ये मुंबईतील केईएम जीएस मेडिकल कॉलेजमधून आपले एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. तर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आंध्र प्रदेशातील कुर्नुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी. महत्त्वाचे म्हणजे हे दोघेही केंद्रीय सेवा परीक्षेत बॅचमेट होते. परीक्षा दिल्यानंतर एकजण आएएस तर दुसरा आयपीएस झाला.

या दोघांच्याही डॉक्टरी पार्श्वभूमीची कोरोना निवारणात मोठी मदत होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून दिले जाणारे निर्देश या दोघांना आपल्या डॉक्टर ज्ञानाने समजून घेणे सोपे जात आहे. जिल्ह्यातील यंत्रणा अहोरात्र कोरोना निर्मूलनासाठी झटत आहेत. त्याला डॉक्टरी ज्ञानाची साथ मिळत असल्याने हे सहज साध्य होत आहे.

चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आंध्र प्रदेशातील कुर्नुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी. मात्र त्यांचा ओढा डॉक्टरी शिक्षणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांकडे वळला. 2011 मध्ये महेश्वर रेड्डी केंद्रीय लोकसेवा परीक्षा पास होऊन ते आयपीएस झाले.

महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर त्यांनी गडचिरोलीत लक्षवेधी कामगिरी करत नक्षलविरोधी मोहिमेचे अवघड काम सहजपणे करून दाखविले. आता कोरोना नियंत्रणाच्या कठीण प्रसंगी त्यांच्या डॉक्टरी शिक्षणाचा मोठा फायदा चंद्रपूर जिल्ह्याला झाला आहे. जिल्ह्यातील पोलिस दलासह नागरिकांच्या बचावासाठी त्यांचे वैद्यकीय ज्ञान मोलाचे ठरत आहे.

संपूर्ण राज्य आणि देश कोरोनाशी मुकाबला करत आहे. मात्र या संकटावर मात करणे नियोजनानेच शक्य होणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर असल्याने त्यांच्या ज्ञानाचा फायदा चंद्रपूरच्या कोरोना नियंत्रणासाठी झाला आहे. जिल्ह्यात एकही कोरोन बाधित रुग्ण नसणे या समन्वय आणि अनुभवाची पावती आहे.