पंतप्रधान मोदींच्या लहान भावाकडून राहुल गांधींना निमंत्रण




दिल्ली | प्रतिनिधी
लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लहान बंधू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण दिले आहे. हा सोहळा ३१मे रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे पार पडणार आहे.

महादेव जानकर यांनी नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, “भाजपाने आमच्याशी सल्लामसलत केली नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारखे मोठे पक्ष महायुतीत सामील झाल्यानंतर भाजपाला छोट्या पक्षांची गरज वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल.”

या भेटीत राहुल गांधी आणि जानकर यांच्यात जातनिहाय जनगणना, शेतकरी प्रश्न व ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. जानकर म्हणाले, “राहुल गांधींनी मला त्यांच्या घरी बोलावले आणि सन्मानाने वागणूक दिली. यानंतर मी स्टॅलिन, शरद पवार आणि तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार आहे.”

२०१९ पासून एनडीएचा घटक असलेल्या रासपला २०२४ लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघ देण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी प्रचारसभेत जानकरांना “माझा लहान भाऊ” म्हणत त्यांना मत देण्याचे आवाहन केले होते. मात्र, जानकरांचा पराभव झाला. त्यानंतर रासपला विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संधी न दिल्याने जानकरांनी १०० उमेदवार स्वबळावर उभे केले.

गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीत अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या जानकरांनी यंदा त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार, स्टॅलिन, अखिलेश यादव यांनाही निमंत्रण देण्यात आले असून जानकर सध्या इंडिया आघाडीच्या नेत्यांशी जवळीक साधताना दिसत आहेत.

त्यामुळे काही महिन्यांपूर्वी एनडीएचा भाग असलेला राष्ट्रीय समाज पक्ष आता इंडिया आघाडीकडे वळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.