चंद्रपूर शहरातील नामवंतअसलेल्या इन्स्पार कोचिंग क्लासेस मध्ये NEET परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. प्रांजली राजूरकर असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. नीट क्लासेसच्या वसतिगृहातच प्रांजलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
प्रांजली ही यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रहिवासी आहे. बारावीनंतर तिने चंद्रपूर शहरातील इन्स्पायर कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. प्रांजली NEET परीक्षेची तयारी करत होती. संस्थेच्या मालकीच्या वसतिगृहातच ती राहत होती. बुधवारी सायंकाळच्या सुमारास खोलीत एकटी असतानाच तिने गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आले नाही. मात्र अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासात विद्यार्थिनीने आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचे गुपित उलगडणार आहे.
विद्यार्थिनीच्या आत्महत्तेनानंतर पोलिसांना उशीरा कळविण्यामागचे कारण काय?
इन्सपायर कोचिंग क्लासेस ही चंद्रपुर शहरातील एक नामांकित शैक्षणिक शिकवणी संस्था आहे मात्र या प्रकरणाची वाच्यता होण्यास झालेला विलंब पोलिस तपासाच्या रडारवर असुन विद्यार्थिनीच्या आत्महत्येसारखे गंभीर प्रकरण कोचिंग क्लासेस व्यवस्थापनाने हाताळतांना पोलिसांना कळविण्यास लावलेला उशिर संशय निर्माण करणारा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट व व्हिडिओ ठेवला होता, परंतु त्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवला व त्यानंतर जो रिपोर्ट येईल तेंव्हाच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.