राज्यातील चेक पोस्ट लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने राज्याला या संदर्भात तिसरे परिपत्रक पाठवले आहे. त्यानुसार राज्य परिवहन विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सगळे कर ऑनलाईन झाल्यानंतर आता चेक पोस्ट बंद करण्याची तयारी सुरू आहे. (RTO Check Post)
केंद्र सरकार कडून आलेल्या तिसऱ्या परिपत्रका नंतर आता राज्यातील चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात 'अभ्यास गटाची' स्थापना करण्यात आली आहे. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर गृहविभागानं अभ्यास गटाची स्थापना केली आहे. 3 महिन्यात या अभ्यास गटाला आपला अहवाल शासनाला द्यावा लागणार आहे. तसे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहे.
लवकरच राज्यातील चेकपोस्ट बाबात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर सीमा तपासणी नाके, म्हणजेच चेक पोस्ट बंद करण्याबाबत अभ्यासगट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा अभ्यासगट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होती आणि त्यावरच्या उपाययोजनांच्या बाबतीच अभ्यास करुन एक अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर चेंक पोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
अभ्यास गट काय करणार?
अभ्यास गटाद्वारे चेकनाके बंद करण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अभ्यास करेल. त्याचप्रमाणे जर चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय झाला, तर त्याची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे करायची, याचाही अहवाल सादर करावा लागणार आहे. यामुळे पुढील 3 महिन्यांत राज्यातील सर्व चेकपोस्ट बंद होण्याची शक्यता आहे.