चंद्रपूर: पडोली वनसडी निर्मार्णाधीन रस्त्यासाठी कोरपना तालुक्यातील वनोजा परिसरात चुनखडी व गौण खनिजाचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पुणे येथील पाटील कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला १० कोटी ८० लाख १४ हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पडोली ते वनसडी या हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत एनएजी- १४३ रस्त्याच्या बांधकामासाठी कोरपना तालुक्यातील वनोजा येथील सर्व्हे क्रमांक ३४/२ व सर्व्हे क्रमांक ३४/३ या खासगी क्षेत्रातून एक हजार ब्रास दगड किंवा मुरूम उत्खननाची तात्पूर्वी परवानगी देण्यात आली होती. परंतु, सदर कंपनीमार्फत परवानगीपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात उत्खनन केल्याचे आढळून आले. त्याचबरोबर खासगी क्षेत्रात क्रेशर बसवून गिट्टी तयार करीत असल्याची बाबही निदर्शनास आली होती. या परिसरात चूनखडक मोठ्या प्रमाणात असून हा खडक उत्खननासाठी भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरने कोणतीही परवानगी न घेता चुनखडीचेही मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे. वनोजा येथील खनिकर्म विभागाच्या आदेशानंतर अवैध उत्खनासंदर्भात भ्रष्टाचारविरोधी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे आणि अभि वांढरे यांनी जिल्हा खनिकर्म विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर खनिकर्म विभागाने कोरपनाच्या तहसीलदारांना मोका चौकशी करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांनी जागेचे मोजमाप करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम १९६६ कलम ४८ (७) (८) नुसार १० कोटी ८० लाख १४ हजारांचा दंड ठोठावला आहे.