दुर्गापूर परिसरात समतानगर येथे आठ वर्षीय प्रतीक शेषराव बावणे या बालकाचा बिबट्याने उचलून नेल्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणावाची स्थिती आहे. आज 31 मार्च रोजी साडेआकरा वाजता उपमहाप्रबंधक कार्यालय दुर्गापूर उपक्षेत्र येथे काॅग्रेसचे स्थानिक नेते प्रशांत भारती यांच्या नेतृत्वाखाली दुर्गापूर येथील ग्रामस्थांनी घेराव आंदोलन केले.
भद्रावती तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी प्रतीक शेषराव बावणे हा आई सोबत दुर्गापूर येथे आला होता. आईचे वडील तेजराम मेश्राम (महाराज) यांच्या मृत्यू झाल्याने ते सर्व जण दुर्गापूर येथे आले.
मेश्राम यांचे पार्थीव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते. तर प्रतीक (नातू) हा घराच्या मागे खेळत होता. तितक्यात बिबट्याने त्या बालकाला फरफटत जंगलात घेऊन गेले. रात्रीच शोध घेतला असता मुंडके धडावेगळे सापडले. मागील महिनाभरापासून येथे वाघ आणि बिबट्या च्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असून, त्याला वेकोलिच्या खाणी कारणीभूत ठरत आहेत. वेकोलि प्रशासनाने या भागांमधील झाडे-झुडपे अद्यापही काढलेली नाहीत. त्यामुळे हिंस्त्र पशु येथे वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये वेकोलि प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेला वेकोलीला जबाबदार धरून काँग्रेसचे प्रशांत भारती यांच्या नेतृत्वात दुर्गापूर येथील स्थानिक नागरिकांनी वेकोलिच्या उप क्षेत्रीय कार्यालयात घेराव आंदोलन केला.त्यात परीसरातील जंगल झुडपे पुर्णतः साफसफाई करणार,हायमास्ट लाईट लावणार,मुलांच्या वडीलांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात येणार,नाल्यांची साफसफाई करणार असल्याचे लेखी आश्वासन उपमहाप्रबंधक कार्यालय दुर्गापूर उपक्षेत्र महाप्रबंधक अरुण लाखे यांनी दिले आहे.त्याच्या लेखी आश्वासनानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी केले कार्यालयाचे तोडफोड
वाघ बिबट्याच्या हल्ल्यात होत असलेली जिवीतहानीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर यांनी यापुर्वी उपोषणाला बसले होते.उपोषण सोडल्यानंतर महीणाभराचा कालावधी लोटला नाही तर पुन्हा बिबट्याने एका बालकाला उचलून घेऊन गेल्याने संतप्त झालेल्या भटारकर यांनी उपक्षेत्रीय कार्यालयाची आज सकाळी तोडफोड केली आहे.याप्रकरणी त्यांच्यावर दुर्गापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.