भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेशराव रोकडे यांचा रासपमध्ये प्रवेश
परभणी जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी शनिवारी (दि. २६) रासपचे संस्थापक महादेव जानकर व आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीमध्ये हजारो समर्थकांसह राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांनी आपल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाचा राजीनामा नुकताच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.

पालम तहसील कार्यालयासमोर हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर तर आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे युवा नेते राजेभाऊ फड, जि.प.सदस्य किशनराव भोसले, राजेश फड, सीताराम राठोड, रासप जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप आळनुरे, कृष्णा सोळंके, पालम पूर्णा प्रभारी माधव गायकवाड, हनुमंत मुंढे, नारायण दुधाटे, बाळासाहेब कुरे, असदुल्ला खाँ पठाण, उबेदखाँ पठाण, हैदरखाँ पठाण, समीर पठाण आदी उपस्थित होते.तालुक्यासह गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, यावेळी गणेशराव रोकडे हे आपल्या हजारो कार्यकर्ते, समर्थकांसह राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश घेतले. त्यामुळे आगामी काळात पालम तालुक्यासह गंगाखेड विधानसभा क्षेत्रात भाजपाला त्याची जागा मोजावी लागणार आहे.असे बोलल्या जात आहे.कारण गणेशराव रोकडे हे भाजपाचे एकनिष्ठ म्हणून जिल्ह्यात ओळख होती.

पक्षासाठी जीवाचे रान केले - गणेशराव रोकडे
मागील अनेक वर्षांपासून आपण भारतीय जनता पक्षामध्ये एकनिष्ठेने काम करीत होतो. गंगाखेड मतदारसंघासह जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी जिवाचे रान केले. देश व राज्यात सत्ता नसतांनाही एकनिष्ठ राहून काम केले. परंतु अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही पक्षासाठी काम करीत असतांना पक्षाने मात्र आम्हाला बळ देण्याचे काम केले नाही. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांवर नेहमीच अन्याय करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे अनेक जुने चेहरे पक्षापासून दुर जातांना दिसत आहेत. आगामी काळात त्याच जिद्दीने महादेव जानकर व आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष वाढीसाठी काम करू व त्याच हिरीरिने जनतेचे प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न करू, असे मत गणेशराव रोकडे यांनी यावेळी व्यक्त केली.