भाजप मुक्त महाराष्ट्राची सुरुवात चंद्रपूर मधून करणार :- पालक मंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार असून येत्या काळात चंद्रपूर जिल्हा भाजप मुक्त जिल्हा होणार असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले ते भद्रावती येथे झालेल्या सरपंचांचा सत्कार व विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
त्यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार , क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देविदास काळे, महासचिव अविनाश वारजुरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई डांगे, महिला शहराध्यक्ष सुनिता अग्रवाल, काँग्रेसच्या केंद्रीय प्रतिनिधी सुनिता लोढीया, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, प्रदेश सचिव संदीप गड्डमवार शिवा राव, प्रदेश महिला सचिव नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


त्यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे व वासुदेव ठाकरे आणि संचालकांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.
विधानसभा क्षेत्रातील तीसहून अधिक वेगवेगळ्या पक्षातील ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे सदस्य ,भद्रावती नगरपालिकेच्या भाजपच्या तीन महिला नगरसेविका निला ढुमणे, जयश्री दातारकर, प्रतिभा निमकर यांनीही काँग्रेस मधे प्रवेश घेतला. वरोरा नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते गजानन मेश्राम यांच्यासह शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजू महाजन, सनी गुप्ता, चंद्रकला चीमुरकर, पंकज नाशिककर, राशी चौधरी, राखी काळपांडे या नगरसेवकाचा समावेश होता.
शिवसेना-भाजपच्या शेकडो आजी माजी पदाधिकाऱ्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला .

यावेळी पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले की, देशात काँग्रेसने हरित क्रांती केली त्यामुळे अन्नासाठी इतर देशांसमोर हात पसरण्याची पाळी आपल्यावर येत नाही, परंतु या देशातील शेतकरी तीन काळा कायद्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. त्यांचे म्हणणे देखील मोदी सरकार ऐकून घेत नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे त्यामुळे देशाला सामर्थ्यवान बनविण्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्र काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे म्हणाला की, या देशात महिला असुरक्षित आहेत महिलांना सुरक्षा कवच देण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आता, महिलांना न्याय देण्याकरिता काँग्रेस पक्ष हा एकमेव पर्याय असून आगामी निवडणुकीत काँग्रेसला मत देऊन आपली चुकी महिलांनी दुरुस्त करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खासदार बाळू धानोरकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा कणा हा शेवटचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान फक्त काँग्रेस पक्षच करतो. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे निवडणूका जिंकत असतात. येत्या काळात ज्या निवडणुका होईल, त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. महाराष्ट्रातील सर्वात मोठे काँग्रेसचे गड चंद्रपूर असेल तसेच या निवडणुकीत पक्षातील शेवटचा कार्यकर्ता हा नेता म्हणून दिसेल असे प्रतिपादन खासदार धानोरकर यांनी केले.