महिलांना आत्‍मनिर्भर करण्‍यासाठी रोटरी क्‍लब ऑफ स्‍मार्ट सिटीने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय – आ. सुधीर मुनगंटीवार






सध्‍या कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्‍या लॉकडाऊनदरम्‍यान गरीब भगिनींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्‍थीतीत त्‍यांना मदतीचा हात मिळावा, रोजगाराचे साधन उपलब्‍ध व्‍हावे या भावनेतून रोटरी क्‍लब ऑफ स्‍मार्ट सिटी आणि ज्ञानदा संस्‍थेतर्फे शिलाई मशीन उपलब्‍ध करून महिलांना रोजगाराचे दिशादर्शन करण्‍याचा हा उपक्रम अभिनंदनीय व स्‍तुत्‍य आहे. डॉ. विद्याताई बांगडे यांनी या उपक्रमासाठी 25 शिलाई मशीन उपलब्‍ध करण्‍याची मागणी माझ्याकडे केली. ती मागणी मी पूर्ण करू शकलो व या उपक्रमात आपले योगदान देवू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. यापुढेही अशा पध्‍दतीच्‍या उपक्रमाला सहकार्य करण्‍यासाठी मी सदैव तत्‍पर राहील अशी ग्‍वाही माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आत्‍मनिर्भर भारताचा संकल्‍प केला असून त्‍या संकल्‍पानुसार महिलांना आत्‍मनिर्भर करण्‍यासाठी रोटरी क्‍लब ऑफ स्‍मार्ट सिटी यांनी घेतलेला पुढाकार प्रत्‍येक संस्‍थेसाठी मार्गदर्शक असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले.

दिनांक 30 जून रोजी रोटरी क्‍लब ऑफ स्‍मार्ट सिटी आणि ज्ञानदा संस्‍था चंद्रपूर यांच्‍यावतीने महिलांना आत्‍मनिर्भर करण्‍यासाठी शिलाई मशीन केंद्राच्‍या शुभारंभ सोहळयात आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी रोटरी क्‍लब ऑफ स्‍मार्ट सिटी चंद्रपूरच्‍या अध्‍यक्षा डॉ. विद्या बांगडे, सचिव रमा गर्ग, उपाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्ञानदा संस्‍थेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. प्रमोद बांगडे आणि प्रकल्‍प संयोजक शकुंतला गोयल यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, या 25 शिलाई मशीनच्‍या माध्‍यमातुन रोजगाराचे दालन गरीब महिलांसाठी खुले करण्‍यात आले आहे. महिलांसाठी स्‍वयंरोजगार उपलब्‍ध व्‍हावे यासाठी मी पालकमंत्री असताना अनेक योजना आपण जिल्‍हयात राबविल्‍या. प्रामुख्‍याने अगरबत्‍ती उद्योग पोंभुर्णा, आगरझरी परिसरात सुरू केला, त्‍या माध्‍यमातुन महिलांना रोजगार उपलब्‍ध करून दिला. त्‍याचप्रमाणे टूथपिक उत्‍पादन केंद्र सुरू केले, त्‍यातुन सुध्‍दा महिलांना रोजगाराची संधी मिळाली. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांची पहिली कुक्‍कुटपालन संस्‍था सुरू झाली. ही संस्‍था आज आदिवासी महिलांसाठी अर्थार्जनाचे मोठे साधन ठरली आहे. बांबु हॅन्‍डीकॉ्फ्ट अॅन्‍ड आर्ट युनिटच्‍या माध्‍यमातुन बांबूची उत्‍पादने तयार करण्‍याची अनेक केंद्र जिल्‍हाभरात आम्‍ही सुरू केली. महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने तेजस्विनी योजना, प्रज्‍वला योजना अशा योजना आम्‍ही सुरू केल्‍या. या माध्‍यमातुन आमच्‍या भगिनीं आत्‍मनिर्भर होतील यावर आम्‍ही नेहमी भर दिला व भविष्‍यातही यादृष्‍टीने प्रयत्‍नशील राहू असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी प्रास्‍ताविकात बोलताना रोटरी क्‍लब ऑफ स्‍मार्ट सिटीच्‍या अध्‍यक्षा डॉ. विद्या बांगडे म्‍हणाल्‍या, प्रत्‍येक स्‍त्रीने आपल्‍या पायावर उभे राहावे, आत्‍मनिर्भर व्‍हावे यासाठी हा प्रकल्‍प आम्‍ही सुरू केला असून फक्‍त भगिनींनी केंद्रावर आपले शिवणकाम घेवून येवून शिवण व्‍यवसाय करण्‍याची संधी आम्‍ही उपलब्‍ध करून देत आहोत. या उपक्रमाला आ. मुनगंटीवार यांचे सहकार्य लाभल्‍याबद्दल त्‍यांचे आभार डॉ. विद्या बांगडे यांनी व्‍यक्‍त केले.