जिल्हा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

जिल्हा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

चंद्रपूर : दोन मे रोजी कोरोना बाधित रुग्णाच्या पॉझिटिव अहवाल मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला.‌ गोपनीय अहवाल आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे सोशल मीडियावर पोहोचला असल्याचा आरोप चंद्रपुरात करण्यात येत आहे. आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्यांनी हा रिपोर्ट बाहेर पाठविला असे सांगण्यात येतं आहे. काल चंद्रपुरातील राजकीय पक्षाचे नेते तथा सामाजिक संस्थांनी यासंदर्भात निवेदने देऊन सदर अहवाल लिक कसा झाला, याबाबत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून हे प्रकरण तपासत असल्याचे कळते. रिपोर्ट कोणी व्हायरल केला यापेक्षा रिपोर्ट लिक कसा झाला याच्यावर तपासात भर द्यायला हवा व दोषींवर कारवाई करण्यात यावी. आरोग्य विभागाची संबंधित असलेला हा अहवाल अत्यंत गोपनीय होता हा लीक झाल्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढणारे दुसरी घटना म्हणजे दि.२ मे ला कोरोना बाधीत रूग्ण मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा बाधीत रूग्ण दि.१तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सदर रुग्णाबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दि.२३ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाले होते कां?अशी विचारणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांना केली असता त्यांनी सदर रूग्ण यापुर्वी भरती झाले नसल्याचे सांगितले. मात्र प्रसारमाध्यमांनी प्रकरण गांभीर्याने उचलून धरल्यानंतर दि.३ मे रोजी आढावा बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी २३ मे रोजी सदर रुग्ण भरती झाल्याचे स्पष्ट केले आहे. 23 एप्रिल रोजी सदर रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासासाठी गेला असल्याचे खुद्द जिल्हा शल्य चिकित्सकांनी कबुली दिली आहे. प्रकरण गंभीर असतानासुद्धा जिल्हा आरोग्य विभाग मात्र झोपेत असल्याचे आता दिसू लागले आहे. प्रकरण चव्हाट्यावर येण्याचे लक्षण दिसताच आरोग्य विभागाने माध्यमांसमोर सदर रुग्ण तपासासाठी आली असल्याचे कबूल केले. रुग्ण विषयीची दखल गांभीर्याने न घेता प्रसारमाध्यमापासून माहीती लपवीली जात असल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये चर्चील्या जात आहे. सदर रुग्ण ज्या ठिकाणी काम करीत होते त्या ठिकाणील क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. मात्र ज्या ठिकाणी काम करीत होता त्या ठिकाणच्या व संपर्कांत आलेल्या लोकांच्या स्वॅब नमुने गोळा करण्यात आले नाही. सदर प्रकरण गंभीर असून आरोग्य विभाग आपल्या चुकांवर पांघरूण घालत नाही ना अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे, चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारावर आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी सूज्ञ नागरिकांकडून होत आहे.
"त्या" अहवालाची जिल्हावासियांना प्रतीक्षा!
शनिवार दिनांक 2 मे ला चंद्रपुरात कोरोना बाधीत रुग्ण मिळाल्यानंतर रुग्ण ज्याठिकाणी चौकीदार म्हणून कामाला होता ते कुटुंब आणि रुग्णाचे कुटुंब यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे,मात्र या बाधीत रुग्णासोबत किती लोकांचा संपर्क आला आणि आतापर्यंत किती रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपुरला पाठविण्यात आले हे शासनाने जाहीर केलेले नाही, आज सायंकाळपर्यंत या नमुन्याच्या अहवाल प्राप्त होईल, जिल्हावासीयांना आता या अहवालाची "भीतीयुक्त" प्रतीक्षा लागली आहे. कालपावेतो (रूग्ण आढळेपर्यंत) रोजच्या रोज असा तपासणी करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या अहवालही येत असतो याची कल्पना फार कमी लोकांना होती. परंतु नुकत्याच मिळालेल्या बाधित रुग्णांमुळे आता या अहवालाची प्रतिक्षा बहुतेकांना लागलेली आहे. बाधीत रूग्णाचे कुटुंब व त्यासोबत घेतलेले काही नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांच्या रिपोर्ट काय येतो याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशाप्रकारे काही तपासणी होऊन त्याचा अहवाल येईल आणि त्याची प्रतीक्षा करावी लागेल असे चंद्रपुरात पहिल्यांदाच घडत आहे. काल मिळालेल्या शासकीय माहितीनुसार बाधित कुटुंबातील सदस्यांचे नमुने स्वॅप अहवालासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले असून बाधित रुग्ण ज्या ठिकाणी कार्य करीत होता त्या कुटुंबांना होम कोरंटाईन करण्यात आले असून त्यांचे नमुने पाच दिवसानंतर नागपूर येथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी काल पाठविण्यात आले त्यांच्या अहवाल आज सायंकाळपर्यंत प्राप्त होईल, या तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालाची "भीतीयुक्त" प्रतीक्षा सूरू आहे.