गडचांदूरात नरेश टॉकीज येथे जुगारावर धाड, पत्रकारांना माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ !

गडचांदूरात नरेश टॉकीज येथे जुगारावर धाड, पत्रकारांना माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ !
नगरसेवक सागर ठाकुरवार सह अन्य आरोपींना अटक!

चंद्रपूर : गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा शिवसेनेचे गटनेते सागर ठाकुरवार सह अन्य आरोपींना काल दिनांक 1 मे रोजी त्यांच्या मालकीच्या नरेश टाकीज येथे जुगार खेळतांना अटक करण्यात आली. दुपारी करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात पत्रकारांना माहिती देण्यास गडचांदूर पोलिसांनी केलेली टाळाटाळ जुगाऱ्यांसोबत गडचांदूर पोलिसांचे असलेले हितसंबंध जोपासणारी होती. सदर वृत्तासंबंधात गडचांदुर पोलिस स्टेशन डायरी अंमलदार, गडचांदुर चे पी.आय. गोपाल भारती यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही रात्रो उशिरापर्यंत सदर प्रतिनीधीला अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
प्राप्त माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा जुगार पकडण्यात आला त्याठिकाणी मोठा जुगार अड्डा चालविल्या जात असून पोलीस विभागाचे कर्मचारीही यावेळी त्या ठिकाणी सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गडचांदूर शहरातील मोठे व्यावसायिक, शहरातील काँग्रेस, भाजपा व शेतकरी संघटनेचे नेते, नगरसेवक,  व्यापारी सुद्धा याठिकाणी जुगार खेळण्यासाठी येत असल्यामुळे व गडचांदूर चे पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांची "खाओ और खाने दो" या वृत्तीमुळे सदर प्रकरणाची तक्रार वरिष्ठ स्तरावर करण्यात आली होती. परंतु या धाडसत्रात यातील मोठे मासे गळाला लागलेचं नाही. आपले बिंग तर फुटणार नाही नां, या भीतीनेच गडचांदूर पोलिसांनी सदर प्रकरण मीडियापर्यंत जाऊ न देण्याची खबरदारी बाळगली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार ह्यांच्या नेतृत्वात टाकलेल्या या धाडीत गडचांदूर नगर पालिकेतील शिवसेनेचे गटनेते सागर ठाकूरवार ह्यांना इतर 5 सहकाऱ्यांसह जुगार खेळतांना रंगेहात अटक करण्यात आली असुन खेळण्यासाठी वापरण्यात आलेले 52 पत्ते, 3300 रुपये रोख, 5 मोबाईल व 5 दुचाकींसह एकुण 165375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती नुसार,  गडचांदूर नगर पालिकेतील शिवसेनेचे गटनेते सागर ठाकुरवार, रतन नकुलवार, शंकर क्षीरसागर, गणेश सातपाळी, गणेश कोल्हे, राजेश महाडोळे हे सहाही लोक वॉर्ड क्रमांक 4 मधिल नरेश टॉकीजच्या वरच्या माळ्यावर असलेल्या खोलीत जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार ह्यांना मिळाली असता त्यांनी आपल्या चमूसह गडचांदूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चौधरी, ए. एस आय अन्सारी, पोशी लिंगेवान ह्यांच्या सहकार्याने धाड घालुन पैसे लाऊन तीन पत्यांचा जुगार खेळत असताना रंगेहात अटक केली असुन त्यांच्याकडून एकुण 165375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई जुगार कायदा कलम 4, 5 तसेच भांदवी च्या सहकलम 188, 269 (22) अन्वये संचारबंदी मोडणे, बेकायदा जमाव करणे ईत्यादी कायद्यान्वये कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
  *गडचांदूर चे पो.नि. गोपाल भारती यांची भुमिका या प्रकरणात संशयास्पद!*
घटना घडलेले स्थळ हे गडचांदुर पोलीस स्टेशनला अगदी लागून हाकेच्या अंतरावर आहे. घटनास्थळावर जाण्यासाठी पोलिसांना फार परिश्रम घ्यावे लागत नाही. परंतु एवढ्या मोठ्या स्तरावर गडचांदूर सारख्या शहरांमध्ये एवढा मोठा व्यावसायिक जुगार होत असेल आणि त्याची माहिती लागूनच असलेल्या पोलीस स्टेशनला नाही ही गोष्ट अकल्पनीय आहे. गडचांदुर चे पीआय गोपाल भारती यांच्यावर विश्वास नसल्यामुळेच वरिष्ठ स्तरावरून ही कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा गडचांदूर मध्ये मोठ्या स्तरावर सुरू आहे. मागील एक-दीड वर्षापासून गोपाल भारती गडचांदूर येथे कार्यरत आहेत. "सगळ्यातच आहे आणि कशातच नाही" अशी त्यांची गोडबोली प्रतिभा असल्याचे बोलले जाते. गडचांदुर मध्ये घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या प्रकरणाच्या सोक्षमोक्ष लावण्यात ते पटाईत आहेत. नुकतीच दारू तस्करी ची एक मोठी घटना गडचांदुर परिसरात घडली. वणी तालुक्यातील कैलास नगर येथील दारू तस्करी करणाऱ्यांना गडचांदूर हद्दीत पकडण्यात आले. घडलेल्या या घटनेत फार मोठी "डेव्हलपमेंट" करण्यात आल्याचे वृत्त यापूर्वीच आम्ही प्रकाशित केले होते. त्या बाबतीत सविस्तर वृत्तमालिका आम्ही प्रकाशित करणार आहोत परंतु त्यापूर्वीच घडलेली ही जुगाराची घटना भारती यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे.