राज्य सरकार देणार कामगारांना प्रत्येकी ५हजार रूपयाचे पॅकेज

राज्य सरकार देणार कामगारांना प्रत्येकी ५हजार रूपयाचे पॅकेज !

केंद्र सरकारचे १ लाख ७० हजार कोटीचे गरीब कल्याण पैकेज जाहीर पण राज्य सरकारकडे पाठवली नाही !

कोरोना अपडेट :-

लॉकडाऊनमुळे रोजगार गमवावा लागणार्‍या नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपये देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील नोंदणीकृत कामगारांची संख्या १२ लाख इतकी आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राज्यातील सर्व उद्योग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील कामगारांच्या अडचणी समजून घेत राज्य सरकार राज्यातील १२ लाख ३८ हजार नोंदणीकृत असलेल्या कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपये देणार असल्याने कामगारांना थोडा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

राज्यातील कामगारांचे प्रश्‍न सोडवून, त्यांना अपेक्षित लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने सुकाणू समिती स्थापन केली आहे. मात्र, समितीचा अद्याप अभ्यास पूर्ण झाला नसल्याने अहवाल अजूनही प्रलंबित आहे. या अहवालाची प्रतीक्षा न करता, राज्यातील नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजारांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असून, मंजुरीनंतर अडीच हजारांचा पहिला टप्पा कामगारांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटींचे गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले आहे. मात्र जाहीर करण्यात आलेल्या या पॅकेजमधून अजून एक दमडीही महाराष्ट्र सरकारकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या कल्याण महामंडाळाकडे विविध उपकराच्या माध्यमातून जमा झालेले ३१ हजार कोटी रुपये आहे. या निधीच्या सहाय्याने राज्यातील नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपये देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे. तर सोमवारी एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 352 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे नवे 905 रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 980 जण बरे झाले आहेत.