माजी मंत्री महादेव जानकर बारामतीतून लढण्याचे संकेत




बारामती : महाराष्ट्रातून फिरुन येऊन मी बारामती लोकसभा मतदारसंघात मुक्कामासाठी येतोय. बारामतीच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मला खूप भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे मी बारामतीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही. बारामतीत लक्ष घालून मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून पुढील रणनीती आखण्यासाठी माझे हे दौरे आहेत. असं सांगत माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर हे मागील तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी करत आहेत. जुन्या मित्रांना भेटून त्यांच्यात मिसळून सायकलिंग करणे, पोहणे, रानावनात मुक्काम करत ते लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. पुन्हा बारामती लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत.
2009 मध्ये महादेव जानकरांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र शरद पवारांनी विजय मिळवला, तर जानकर तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर 2014 मध्ये महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकला होता. परंतु मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान

जानेवारी 2015 मध्ये जानकर राष्ट्रीय समाज पक्षातून विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर 2016 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली.

सरकार पडले तर उत्तमच – जानकर

‘दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकार पडेल या भाजपच्या टिप्पणीवर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. माझे केवळ दोन आमदार आहेत. त्यामुळे ज्यावेळेस आमदार वाढतील, तेव्हा त्या विषयावर बोलणे योग्य होईल. भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे. ते जर असे म्हणत असतील, तर सरकार पडले तर उत्तम होईल असेही महादेव जानकर म्हणाले.

वीज तोडणी बंद न केल्यास आंदोलन करणार – महादेव जानकर

राज्य सरकार घूमजाव करीत आहे. अधिवेशन संपेपर्यंत वीज तोडणार नाही यावर सरकारने होकार दिला आणि अधिवेशन संपताच वीज तोडणी सुरू केली, हे योग्य नाही. आघाडी सरकार देखील शेतकऱ्यांची हिताचे आहे, मात्र आघाडी सरकारच्या मंत्र्यांना त्यांनी विनंती करत शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष मोठे आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला