▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455 ▪️ RNI No. MAHMAR/2011/37424/

"जातीय समीकरणाच्या सावटात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या?चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या तडकाफडकी झालेल्या बदल्या "जातीय समीकरणाच्या सावटात" झाल्याचे गालबोट लागत आहे. काही दिवसांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस पी फासे यांचे आकस्मिक बदली झाली होती? अत्यंत भावूक वातावरणात त्यांच्या निरोप समारंभ पार पडला होता. चंद्रपूर चे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता राजु घुगे यांची नुकतीच झालेली बदली त्यांच्या झालेल्या भावनिक निरोप समारंभ बघता राजकीय समीकरणाच्या द्वेशातून या बदल्या घडवण्यात आल्या असल्याचे बोलल्या जात आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील हे अधिकारी अत्यंत कष्टाने या पदापर्यंत पोचले आहेत. आपले कर्तव्य पार पाडताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला परंतु कर्तव्यात त्यांनी बजावलेली प्रामाणिकता त्यांच्या झालेल्या निरोप समारंभ दिसल्या. कुटील राजकीय घडामोडीत झालेल्या या बदलामुळे सत्ताधाऱ्यांवर आता जातीय समीकरणाचे आरोप होऊ लागले आहे. अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सन्मानित करायला हवी परंतु अपमानित करून विशिष्ट वर्गाच्या अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या बदल्या सत्ताधार्‍यांना भविष्यात बोचणाऱ्या ठरतील, यात संशय नाही.अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सन्मानित करायला हवे परंतु अपमानित करून विशिष्ट वर्गाच्या अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या बदल्या सत्ताधार्‍यांना भविष्यात "उताण्या" पाडणाऱ्या ठरतील, यात संशय नाही.

कर्तव्यदक्ष निर्दोष अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता कोणाचा जाईल राजकीय बळी?

सध्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. मनपाचे आयुक्त संजय काकडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि चंद्रपुर सुपर थर्मल पावर स्टेशनचे राजू घुगे यांच्यानंतर आता कोणता अधिकारी राजकीय बळी ठरेल? याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागलेले आहे.
मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये कोरोना साथरोगाच्या(?) प्रादुर्भावामुळे लागलेल्या संचार बंदीमुळे संपूर्ण देशवासी भीतीने सिकुडले आहेत. या आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापले कर्तव्य जबाबदारी ने पार पाडले, त्यामुळेच जिल्ह्यामध्ये मे महिन्यांपर्यंत कोणताही रूग्ण आढळला नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकिय क्षेत्रातील असलेले तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भुमिका मोलाची राहिली. २ मे रोजी चंद्रपूरात कृष्णनगर परिसरात पहिला रूग्ण आढळला आणि चंद्रपूरवासियांना धडकी भरली आहे. पहिल्या रूग्णानंतर अंदाजे १०४ दिवसांमध्ये आज कोरोना बाधितांची संख्या ही १००० चा आकडा पार केली आहे. चंद्रपूर जिल्हावासी कोरोना (?) भयग्रस्त असतांना जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या राजकीय सुड भावनेतुन झाल्याचे आता बोलल्या जात आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या हा एक प्रशासकीयक भाग असतो. एका विशीष्ट अवधीनंतर अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यासाठी कुठे ना कुठे जावेच लागते. परंतु अवधी संपण्याच्या पुर्वी त्यांच्या जिल्ह्यामधून झालेल्या बदल्या हा सध्या जिल्ह्यात "चिंतनाचा" विषय ठरत आहे. नविन अधिकाऱ्यांना क्षेत्रातील मुळ समस्या व भुभाग समजण्यासाठी अवधी लागतो. मगं अशा भयावह स्थितीमध्ये जुन्या अधिकाऱ्यांचा अवधी संपण्यापूर्वी नव्या अधिकाऱ्यांनख कां बरे पाचारण करण्यात येत आहे. हे कुटील राजकारण म्हणजे 'अंधेर नगरी चौपट राजा' असल्याचे नागरिकांमध्ये आता बोलल्या जात आहे.

चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त संजय काकडे यांच्या बदलीनंतर त्यांची जागा नागपुरहून आलेल्या राजेश मोहिते यांनी घेतली. कोरोना संक्रमण काळात महत्वाची भुमिका बजावणारे चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची 'मनी ध्यानी नसतांना" आकस्मिक बदली करण्यात आली. जिल्ह्यामध्ये त्यांचा अजुन ही एक वर्षाचा कार्यकाळ राहिलेला होता. त्यांच्या आकस्मिक झालेल्या बदलीमुळे वातावरण तापले, अनेकांनी त्यांच्या बदलीचे जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांचे कुटील राजकीय कारस्थान असल्याचा आगडोंब केला. त्यांच्या जागी मुंबईहून आलेले नविन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे विरोधात सोशल मिडीयावर प्रतिक्रिया उमटल्या. परंतु जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे हे कुटील कारस्थान जनतेच्या नजरेमध्ये खटकल्याशिवाय राहिले नाही. एकीकडे कोरोना ची भिती तर दुसरीकडे स्वहिताचे राजकीय स्वार्थ या दोन ही बाबी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या बदलीमागे कारणीभूत असल्याचे आता नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी डॉ. खेमणार यांच्या बदलीचा निषेध केला, आंदोलने केली. जि. प. ने तर खेमणार यांची बदली रद्द व्हावी यासाठी ठराव ही घेतला, परंतु तडकाफडकी नवनियुक्त जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी पदभार उरकुन टाकला.

चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये आपली भुमि (जमिन) गेलेल्यांना अद्याप ही नौकरी मिळाली नाही. १९८०-८२ पासून हे प्रकल्पग्रस्त शासनाकडे आपल्या न्याय हक्काची मागणी करीत आहेत, आश्वासनाव्यतिरिक्त त्यांना अद्यापपावेतो काहीही मिळाले नाही. सरकारे बदलली, प्रत्येकाने वेळ मारून नेली. आता प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे वय निघून जात आहे. जमिन आमची, विज आमच्या जिल्ह्यातून मग विज प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणारा भुमिपूत्र न्यायापासून वंचित राहत असल्याचे विदारक चित्र भारताच्या स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्षी चंद्रपूरात दिसत आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी ७ प्रकल्पग्रस्त मागील १० दिवसांपासून जमिनीपासून उंच असलेल्या थर्मल पॉवर स्टेशनच्या चिमण्यांवर चढले. न्याय तर मिळाला नाही परंतु मागील काही दिवसांपासून त्यांना मिळणारे अन्न व पाणी सुद्धा बंद करण्यात आले होते. अखेर १४ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनानंतर आपले उपोषण सोडले. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चे मुख्य अभियंता यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अवघा एक वर्षाचा कार्यकाळ काढलेले मुख्य अभियंता राजु घुगे यांची बदली कोणत्या कारणास्तव करण्यात आली या चर्चेला आता उधाण आले आहे. प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यांना अन्न व पाणी पोहोचविण्याची चुक जर त्यांनी केली असेल व त्यामुळे त्यांना बदलीला सामोरे जावे लागत असेल, तर सत्ताधाऱ्यांना जनताजनार्दन स्वातंत्र्यांच्या काळात जगत आहे, बहुतेक याचा विसर पडलेला आहे, असेच म्हणावे लागेल.

कर्तव्यदक्ष निर्दोष अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता कोणाचा राजकीय बळी जाईल, याची ही चर्चा जिल्ह्यात सुरू झालेली आहे. येणाऱ्या एक-दोन दिवसांत ते कळेलच. परंतु राजकीय स्वार्थापोटी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कसोटीवर उतरावे लागत असेल, तर सत्ताधाऱ्यांनी ही स्थिती घातक आहे, याची जाण अवश्य ठेवायला हवी, याच अपेक्षेसह भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा !